इचलकरंजी प्रांत कार्यालयावर सोमवारी बैलांसह मोर्चा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात लाकूड ओढण्याच्या शर्यतीची शतकोत्तर परंपरा आहे. शासनाच्या नियमानुसार स्पर्धा घेतली जात असताना कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आयोजित स्पर्धा घेण्यास शासन अध्यादेशातील नियमांवर बोट ठेवून परवानगी नाकारली आहे. त्यामुळे स्पर्धा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवार दि. ३० मे रोजी प्रांत कार्यालयावर बैलांसह मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांनी १९०५ मध्ये शहरात लाकूड ओढण्याच्या शर्यती सुरु केल्या. त्याला शतकोत्तर परंपरा असून दरवर्षी कर्नाटकी बेंदूर सणाच्या निमित्ताने या स्पर्धा घेतल्या जातात. त्याचबरोबर जनवारांचे प्रदर्शन, कर तोडणे आणि बक्षिस वितरण असा भव्य कार्यक्रम घेतले जातात. मध्यंतरीच्या काळात कोरोना महामारीमुळे बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने अत्यंत साध्या पध्दतीने बेंदूर साजरा करण्यात आला. तर नुकतीच बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी शासनाने उठविल्याने यंदा बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासन नियमानुसार आवश्यक ती परवानगी मागितली असताना प्रांताधिकार्‍यांनी ती नाकारली आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरात शासनाच्या नियमानुसार परवानगी घेऊन लाकूड ओढण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. परंतु आता परवानगी नाकारण्याचे शासन अध्यादेशाचे कारण पुढे केले असले तरी त्या मागचे नेमके कारण काय? याचा शोध घेणे गरजेचे आहे. मागील शर्यतीसाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रांताधिकारी यांनी परवानगी दिलेली होती. मात्र आता परवानगी का नाकारली? असे करुन शहरातील शतकोत्तर परंपरेला फाटा देण्याचाच प्रयत्न केला जात आहे. परवानगी मिळावी यासाठी आमदार आवाडे हे सुध्दा शासन दरबारी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी लाकूड ओढण्याच्या शर्यती घेण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा सोमवार ३० मे रोजी नाट्यगृह चौकापासून प्रांत कार्यालयावर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, तरुणांचा बैलांसह असा मोर्चा काढण्यात येईल, असे कलागते यांनी सांगितले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, नंदू उर्फ बाबासो पाटील, शेखर शहा, राहुल घाट, राजेंद्र बचाटे, बबलू सुतार, बजरंग कुंभार, बिलाल पटवेगार आदी उपस्थित होते.