मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाच्या रचनेबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश आले आहेत.
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची रचना करत असताना तालुक्यातील राजकीय लोकांच्या दबावाखाली राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेच्या विरोधात जाऊन प्रभाग प्रारूप नकाशे केले असल्याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व पुराव्यानिशी प्रारुप प्रभाग नकाशे सहित तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आमदार प्रकाश आवाडे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना राज्य निवडणूक आयोगाच्या 9 मे 2022 च्या मार्गदर्शक सूचनांनुसारच प्रारुप प्रभाग रचना करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कोल्हापूर व विभागीय आयुक्त पुणे यांना राज्य निवडणूक आयोगाने आज ई-मेल द्वारे हे आदेश लागू केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचा आदेश येऊनही जर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या 9 मे 2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रभाग प्रारुप नकाशे केले नाही तर जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदार हातकणगले यांचे विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार व येणाऱ्या अधिवेशनामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व हातकणंगलेच्या तहसीलदारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.