कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प लवकरच पूर्ण करू, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात सत्तांतराच्या वर्षपूतीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
‘गोकुळ’ची वाटचाल कशी सुरू आहे व पुढे कशी असेल याचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे पहिले वर्ष हे संकल्पपूर्तीचे आणि सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धीगंत करणारे ठरले आहे.गेल्या वर्षी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली. या माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीबद्दल वर्षभरात राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी करणे गरजेचे आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. संघाची वार्षिक उलाढाल रू.२९२९ कोटी इतकी आहे. गतसालपेक्षा ३७८ कोटी वाढ झालेली आहे.
पाटील म्हणाले, वर्षभराच्या कालावधीत दूध उत्पाकांना दूध खरेदी दरात दोन वेळा वाढ करण्यात आली असून
भविष्यकालीन वेध घेत गोकुळ विस्तारासाठी भोकरपाडा खोपोली येथे बारा एकर जागा खरेदी प्रस्तावित आहे. मुंबई वाशी शाखा विस्तारीकरण, नवीन पेट्रोल पंपास मान्यता तसेच म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबिवण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मेडिकल ग्रेड ऑक्सीजन प्लॅन्ट सुरू केला असून भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार यांना सिलेक्ट (यु.एच.टी) टेट्रापॅक दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळ बासुंदी हे नवीन उत्पादन चालू केले आहे. NDDB च्या सहकार्याने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत, बायोगॅस प्लॉन्ट, व फिरती मिल्किंग मशीन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहेत.
पाटील म्हणाले, टेट्रापॅकमध्ये ताक व विविध स्वादामध्ये सुगंधी दूध ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असून महालक्ष्मी पशुखाद्यमार्फत जनावराचे ताणतणाव कमी करणेसाठी व दुधाची गुणप्रत वाढविण्यासाठी स्ट्रेसनील खाद्य पुरकाची निर्मीती करणे. व जनावराची गाभण तक्रार निवारण्यासाठी फर्टीलिटी फीड खाद्याची निर्मीती करण्यात येणार आहे. जनावराच्या भाकड काळ कमी होण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम गर्भ प्रत्यारोपण (I VF) ही संकल्पना राबवणे साठी प्रयत्नशील आहोत. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना विस्तारीकरण प्रस्ताव विचारीधीन आहे.
संघाचे दुग्धजन्यपदार्थ विक्रीसाठी विविध रेल्वे स्टेशन वर उपलब्ध केले जाणार आहेत .राष्ट्रीय कृषी विकास योजने (आर.के.व्ही.वाय) अतंर्गत बॉयलर, पावडर प्लॅन्ट, चिलिंग सेंटर इत्यादीचे कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. केंद्रशासनाची निवृत्ती पेन्शन योजना ही दूध उत्पादकांना फायद्याची असुन ती आमलात आणण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघ करत आहे. एन.डी.डी.बी मार्फत एन.पी.डी.डी १ कार्यक्रमा अंतर्गत ३० नवीन बल्क कुलर बसविण्याचे नियोजन आहे.