कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्जावरील व्याज परत देऊन आर्थिक मागास मराठा उद्योजकांना पाठबळ दिले जाते. यामध्ये आजअखेर 43 हजार लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला असून व्याज परतावा देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 4 हजार 815 लाभार्थी आहेत, अशी माहिती महामंडळाच्या समन्वयकांनी दिली आहे.
जिल्ह्यात आज अखेर महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून सुमारे 26 कोटी 74 लाख 27 हजार 777 रुपये व्याज मराठा उद्योजकांना मिळाले आहे. तसेच विविध बँका मार्फत जवळपास 396 कोटी 4 लाख 36 हजार 97 रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नोव्हेंबर 2017 पासून हिंदू मराठा या प्रवर्गासाठी काम करत आहे. महामंडळामार्फत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केलेल्या सर्व लाभार्थ्यांनी व्याज व हप्ते नियमित बँकेकडे भरल्यास त्यांना त्याचे 12 टक्के पर्यंतचे व्याज त्यांच्या खात्यात सुरळीत येत आहे. व्याज परताव्याची मागणी करण्यासाठी वेळेत भरलेले हप्ते यांचे क्लेम करणे महत्वाचे असते. या खाते उताऱ्यावर बँकेची सही, शिक्का अनिवार्य असतो. प्रत्येक चौथ्या क्लेम वेळी व्यवसायाचा नवीन फोटो अपलोड करणे गरजेचे असते. अशा काही त्रुटी राहील्यास प्रकरण प्रलंबित ठेवले जाते. या संदर्भातील संदेश रजिस्टर मोबाईल नंबर वर येतात. योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास थकीत व्याज ही महामंडळाकडून लाभार्थ्यांना दिले जाते. अण्णासाहेब पाटील महामंडळात लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे व्याज सुरळीत येत आहेत. प्रलंबित प्रकरण (क्लेम होल्ड) बाबत काही अडचणी येत असल्यास जिल्हा कार्यालयात संपर्क साधून अडचणींचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे व पुष्पक पालव, सतीश माने, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर यांनी केले आहे.