कोल्हापूर : बालविवाह ही गंभीर समस्या असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देवून कायद्याअंतर्गत त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत जाणीवजागृती करावी. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयात चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागाची बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील (गृह), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, पोलीस आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या आहे. बाल विवाहामुळे माता मृत्यू, बाल मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बालविवाहाच्या घटना वेळीच रोखणे आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. या घटना रोखण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असून अशा घटना आढळल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरुन कारवाई करावी, अशा सूचना देवून बालविवाहाच्या घटना घडू नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. कामाच्या ठिकाणी अत्याचार होवू नये, यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करणे बंधनकारक आहे. अशा समित्या सर्व आस्थापनांमध्ये स्थापन झाल्याची खात्री पोलीस विभागाने करावी, अशी सूचना त्यांनी केली.