चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले असून या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाता येणार आहे. समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली आहे.
वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात हे वाहन विशेष सहाय्यभूत ठरणार आहे. या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची खास काळजी घेण्यात आली आहे. असे पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल दाखल झाले आहे. या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात अशी वाहने समाविष्ट केली जाणार आहेत.
मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक वेळा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते. मात्र वाघ पकडण्याची ही मोहीम अनेक वेळा दीर्घकाळ चालते. यामुळे श्रम-पैसा आणि वेळ यांचा खूप अपव्यय होतो. सोबतच वाघ पकडायला वेळ लागल्यास ती वाघ किंवा माणसांच्या जीवावर बेतू शकते.