नामदेव ठोंबरेने मारले घुणकीचे कुस्ती मैदान

घुणकी (प्रतिनिधी) : हलगी-खैताळाचा चैतन्यदायी आवाज, पैलवानांचे घुमणारे शड्डू, हजारो प्रेक्षकांच्याकडून होणारा टाळ्यांचा गजर अशा मर्दानी वातावरणात हातकणंगले तालुक्यातील घुणकीच्या श्री मंगोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान झाले. या मैदानात नामदेव ठोंबरेने प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत बाजी मारली.
श्री मंगोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान, सायकल व सिंगल घोडा शर्यतीचे आयोजन केले होते. कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत पैलवान नामदेव ठोंबरे ‘घुणकी श्री’चा मानकरी ठरला. त्याने चटकदार कुस्ती करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चार महिला कुस्त्या झाल्या. मैदानामध्ये हलगी- खैताळचा आवाज दुमदुमत होता. या मैदानात लहान-मोठ्या २०० च्या वर कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली.
कुस्ती मैदानाच्या आयोजनासाठी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, वारणा उद्योग समूहाचे नेते व वारणा साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.विनय कोरे तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या यात्रेनिमित्त दुसर्‍यादिवशी परंपरेनुसार श्री मंगोबा देवाच्या पालखी सोहळा देवळाभोवती प्रदक्षिणा ढोलाच्या गजरात व भंडाराच्या उधळणीत मोठ्या उत्साहाने पार पडला.