अलिबाग : मराठा आरक्षणबाबत केंद्राने पार्लमेंटमध्ये बिल पास करण्यासाठी आग्रह धरावा, मात्र आंदोलन न करता मार्ग काढावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांना केले होते. राज्याच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आम्ही सोडवू, मात्र राज्यातील अखत्यारीत नसलेले प्रश्न सोडविणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
त्याचबरोबर दिशा सलियन प्रकरण, राजकीय चिखलफेक, ईडी आणि किरीट सोमय्या या विषयांवरही आपले स्पष्ट मत व्यक्त केले.रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून डॉ. सी. डी. देशमुख यांच्या नावाने अद्ययावत शहर सभागृह उभारले जात आहे. २२ कोटी खर्च करून हे ८०० आसन व्यवस्था, ई लायब्ररी, सभागृह, अभ्यासिका, मीटिंग हॉल, सोलर सिस्टम असे अद्यावत सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी निधी नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे उपस्थित होते.