शैक्षणिक यशाच्या जोरावर शाहू ग्रुपचे नाव उज्वल करा-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; कामगार पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागलशैक्षणिक यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह कारखाना,पतसंस्था आणि शाहू ग्रुपचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

 

येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना सेवकांच्या कर्मचारी पतसंस्थेतर्फे सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारवेळी त्या बोलत होत्या.

 

त्या पुढे म्हणाल्या,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सभासद शेतकरी, कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी ठेवून अनेक कल्याणकारी उपक्रम सुरू केले. त्यांची ही प्रेरणादायी परंपरा आज शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षमपणे पुढे नेली जात आहे. या संधीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर आपल्या आयुष्यात मोठे यश संपादन करावे. स्वर्गीय राजेसाहेब यांनी मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली होती. शाहू साखर कारखान्याच्या सभासदांच्या शिष्यवृत्ती योजनेत मुलींना मुलांच्या तुलनेत अधिक प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते.आज मुलांच्या तुलनेत मुली शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आहेत.ही अभिमानास्पद बाब आहे.

 

पतसंस्थेचे चेअरमन व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले,स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनातून तब्बल २३ वर्षांपूर्वी कर्मचारी सभासदांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सभासद कल्याण निधीतून ही योजना सुरू करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ही केवळ परंपरा नसून शिक्षणाला प्रेरणा देणारी सामाजिक बांधिलकी आहे.भविष्यातही ही योजना अधिक प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पतसंस्था कटिबद्ध राहील.

 

कार्यक्रमास संचालक मंडळ,अधिकारी, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

सचिव धोंडीराम पाटील यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष भरत कदम यांनी आभार मानले.

 

 

🤙 8080365706