लिंगनूर:लिंगनूर क|| नूल ता. गडहिंग्लज येथील हनुमान तालीम व गावात दरवर्षी भरणाऱ्या कुस्ती मैदानासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

लिंगनूर क. नुल ता. गडहिंग्लज येथे हनुमान तालीम तसेच दलित वस्तीतील नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आंबेओहोळ प्रकल्पामुळे या पंचक्रोशीची हरितक्रांती होत आहे. राज्यात सर्वाधिक जास्त पाणीसाठा आंबेओहळ प्रकल्पात शिल्लक आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, हे पाणी शेतीसाठी उचलण्याची गरज आहे. त्यासाठी गरज पडली तर दोन-तीन बंधारे नवीन बांधू.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, गावागावांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. हनुमान तालीम व सांस्कृतिक सभागृहामुळे स्थानिक युवकांना सरावासाठी तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लिंगनूर क. नुल गावाच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून गाव तिथे तालीम ही आपली संस्कृती आहे. हे गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची या विभागाची कुस्ती पंढरी आहे
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सौ. शैलजा पाटील, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, नगरसेवक विठ्ठल भमाणगोळ, अमर मांगले, संतोष चिकोडे, अण्णासाहेब देवगोंडा, पंचायत समितीच्या सदस्या सौ. सुनीता देसाई, करंबळीचे सरपंच अनुप पाटील, लिंगनूरच्या सरपंच सौ. कमल कुडचे, उपसरपंच संजय कांबळे, नेताजी पाटील, पृथ्वीराज पाटील, अशोक कुरळे, शंकर कुरळे, अण्णाप्पा कुरळे, विजय भुरगुडा, प्रकाश पाटील, रावसो पाटील, काशिनाथ कांबळे, सुरेश कुरळे, शंकर घुगरी, संजय कांबळे आदीप्रमुख उपस्थित होते.
………..
