आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जदारांना नियमित व्याज परताव्यासाठी भरीव निधीची तरतूद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगे यांची आग्रही मागणी

कागल  :
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्जदारांना गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला व्याज परतावा नियमितपणे मिळण्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करावी,अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी हे निवेदन सादर केले. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

 

 

 

निवेदनात म्हटले आहे की, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील तब्बल एक लाख ८१ हजार ३२४ लाभार्थ्यांनी १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेत स्वतःचे व्यवसाय उभे केले आहेत. या योजनेमुळे हजारो युवक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले असून त्यांनी स्वतःच्या करिअरला नवी दिशा दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास २३ हजारांहून अधिक तरुणांनी या योजनेतून १० ते १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊन छोटे-मोठे उद्योग सुरू केले आहेत. विशेषतः राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक मराठा समाजातील युवकांना या योजनेतून कर्जपुरवठा करण्यामध्ये अग्रेसर ठरली आहे. १७३८तरुणांना १७२ कोटी ६८लाख रुपये इतक्या रकमेचा कर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे हे तरुण यशस्वी उद्योजक बनले असल्याचे घाटगे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या महामंडळाच्या योजनांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून व्याज परतावा नियमित न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. नियमित हप्ते भरताना तरुण उद्योजकांना मोठी कसरत करावी लागत असून, हप्ते थकल्यास व्याज परताव्याचा लाभ बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने उभे केलेले उद्योग अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे घाटगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुण उद्योजकांना दिलासा देण्यासाठी व्याज परतावा तातडीने आणि नियमितपणे मिळावा यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी घाटगे यांनी केली.

🤙 8080365706