कोल्हापूर: प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये असे निर्देश दिले.

पालकमंत्री आबिटकर पुढे म्हणाले की, 15 वर्षांपुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू तर वाहनाच्या ओव्हरलोडींगबाबत आरटीओमार्फत जो अवास्तव दंड आकारला जातो आहे त्या दंडासंदर्भात आरटीओने फेरविचार करावा अशा सुचना केल्या.
या आढावा बैठकीत कागल येथील खाजगी आरटीओ चेक पोस्ट बॉर्डर बंद करावी, तावडे हॉटेल जवळील 13.5 जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्स साठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभा करावे, ई – चालन पद्धत रद्द करावी, तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे, महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्यावतीने या बैठकीत करण्यात आल्या. या अनुषंगाने महामार्ग पोलीस, परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानरगपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी-पाटील, मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मल्हारी पाटील, शंभूराजे पवार, विशाल बागडे, लॉरी असोशिएशनचे सचिव हेमंत डिसले, खजिनदार प्रकाश केसरकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक आदी उपस्थित होते.