जनगणना २०२७ : १ मे पासून ‘स्वगणना’; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे आवाहन

कोल्हापूर: भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’च्या पहिल्या टप्प्याला उद्या, १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरुवात होत आहे. या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची संधी देणारे ‘स्वगणना’ पोर्टल महाराष्ट्रासाठी कार्यान्वित केले जाणार असून, जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी पोर्टलवर आपली माहिती भरून या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. माहिती संकलनाच्या पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी आणि गृहनिर्माण’ या विषयावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना जनगणनेत उत्स्फूर्त सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आवाहन केले आहे.

 

या मोहिमेत https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आपली माहिती भरता येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय असून, यामध्ये घराची स्थिती, उपलब्ध भौतिक सुविधा आणि कुटुंबाची मालमत्ता यांसारखी ‘संख्यात्मक’ माहिती संकलित केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क असून, नागरिकांनी कोणत्याही फसव्या लिंकवर विश्वास ठेवू नये किंवा आपला ओटीपी कोणालाही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला अचूक डेटाबेस तयार करण्यास मदत होणार आहे.

उद्यापासून सुरू होणारा हा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांच्या देशव्यापी नियोजनाचा एक भाग आहे. महाराष्ट्रात विशेषतः १६ मे पासून प्रगणक प्रत्यक्ष भेटी देणार असले, तरी त्यापूर्वी १५ मे पर्यंत नागरिकांनी ‘स्वगणना’ पोर्टलचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रगणक जेव्हा मोबाईल ॲपसह नागरिकांच्या दारी येतील, तेव्हा पोर्टलवर आधीच नोंदणी केलेल्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. ही डिजिटल जनगणना केवळ आकडेवारी नसून, भविष्यातील रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे, सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात हिरीरीने सहभागी व्हावे आणि देशाच्या प्रगतीची वीट रचण्यास मदत करावी, अशी आशा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
००००००

🤙 8080365706