हिंदुस्थानात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर, इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या – संजय चौगुले

कुंभोज  (विनोद शिंगे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “ईव्हीएम हटाव-देश बचाव” या घोषवाक्यखाली आज पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधील शाहूवाडी तालुक्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना, मागील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या.

 

 

या निवडणुकांमध्ये महायुती सरकार बाबत असलेला जनसामान्यांमध्ये प्रचंडआक्रोश आणि महाविकास आघाडी बाबत लोकांच्या मध्ये असणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नव्हती, परंतु ईव्हीएम मशीनच्या कृपेमुळे आणि त्यात केलेल्या बिघाडामुळे महायुती सत्ता राखण्यामध्ये जरी यशस्वी झाली असली तरी, मिळवलेली सत्ता ही महायुतीच्या कर्तुत्वामुळे नसून, ती केवळ ईव्हीएम मशीनच्या कृपेमुळे आली आहे अशा चर्चा आता गावागावात जनसामान्यांच्यात रंगू लागल्या आहेत.

ज्या अमेरिकेने हे ईव्हीएम मशीन बनवलं त्यांच्यासहित इतर राष्ट्रांनी या मशीनवर बंदी आणून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचे तत्व स्वीकारले असताना, ईव्हीएम मशीनचा अट्टाहास भारतामध्येच का? खऱ्या अर्थाने जर हिंदुस्थानामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर केंद्र सरकारने ईव्हीएम मशीन बंद करून इथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या केवळ बॅलेट पेपरवर घ्याव्यात असे परखड मत या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केले. तसेच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसैनिकांच्या साथीने ईव्हीएम मशीन हटवण्या संदर्भात सुरू असलेला हा लढा अधिक जोमाने लढणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाप्रमुखांनी दिली.

या आंदोलनास उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पवार, उपतालुकाप्रमुख योगेश कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख निवास कदम, उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार, उपतालुकाप्रमुख विजय लाटकर, महीला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूनम भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश माउंटकर, प्रभा मोरे, मलकापूरचे नगरसेवक सुहास पाटील, अभिमन्यू पाटील, बाजीराव गायकवाड, हेमंत पाटील, राहुल पोवार, तानाजी पवार, प्रविण पाटील, नारायण सुतार तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.