कोल्हापूर : निवडणुकीतला पराभव म्हणजे पाप नव्हे. यामुळे शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी नाउमेद किंवा खचून न जाता सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी झटत राहावे, असे प्रतिपादन माजी आ. सत्यजित पाटील यांनी सरूड (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
सरूड येथील शुभारंभ मल्टीपर्पज हॉलमध्ये गुरुवारी (ता.२८) हा आभार मेळावा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय अपप्रवृत्तीचा पाडाव करण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी निवडणुकीत राजकीय अपप्रवृत्तीचा पाडाव करण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन हि त्यांनी केले.
माजी आ. सरूडकर म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीचा आवाज दाबला जातोय. राजकारण होतकरू, सर्वसामान्यांच्या हाताबाहेर जात असल्याची चिंता सतावतेय. पैशाने याआधीही कधी राजकारण केले नाही, पुढेही ते कधी करणार नाही. तरीही मतदारसंघातील जनता निस्वार्थ भावनेने माझ्या पाठीशी राहिल्याने जय पराजयाची चिंता न करता लढण्याचे सामर्थ्य मिळाले. यात प्रत्येक निवडणुकीनंतर मतांची शिदोरी वाढत गेल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा. प्रकाश नाईक, प्रकाश कांबळे (करूंगळे), वसंत पाटील (उकोली), शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार, शेकापचे भाई भारत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, माजी सभापती विजय खोत, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, एन. डी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र पाटील, जालिंदर पाटील, दिलीप पाटील, उपसभापती पांडुरंग पाटील, भीमराव पाटील, आसिफ मोकाशी, संजय धोंगडे आदी शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.