दिग्गजांचं भविष्य मतपेटीत होणार बंद

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 5 अप्पर पोलीस आयुक्तांसह 25 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 264 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई उत्तर लोकसभा जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यानंतर सर्वांनाच 4 जूनच्या निकालाची उत्सूकता लागलेली आहे.

दिंडोरी येथील केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभेच्या एकूण 35 जागांवर मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व जागांवर मतदान पूर्ण होणार आहे.