खोकुर्ले येथे भरवस्तीत पुन्हा बिबट्या घुसला, नागरिक भयभीत ; वनविभागाला निवेदन

साळवण : खोकुर्ले ता.गगनबावडा येथे बिबट्याने भरवस्तीत लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेर कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले आहे.त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबतच खोकुर्ले ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले.· खोकुर्ले येथे भरवस्तीमध्ये लक्ष्मण येसबा पाटील व यशवंत तुकाराम पाटील यांच्या घराभोवती बिबट्याने फिरून कुत्र्यावर हल्ला केला आहे.

गावामध्ये गेले महिना- दोन महिने बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे.शनिवारी उत्तर रात्री खोकुर्ले गावातील शेतकरी लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेरील असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून हा कुत्रा फस्त केला आहे.खोकुर्ले येथील भरवस्तीत बिबट्या घुसल्याने आम्ही जगायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या आगोदर गावातील शेतमजूर धोंडीराम गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने शेळी ठार मारून नेली आहे.त्याचबरोबर बाळू कसबले यांच्या गोठ्यामध्येही बिबट्याने प्रवेश करून कुत्र्यावर हल्ला केला होता.याबाबत वनविभागाने लावलेल्या सी.सी.टी.व्ही.मध्ये बिबट्या स्पष्ट दिसत आहे.बिबट्याच्या मानवी वस्तीमध्ये प्रवेशाने नागरिक व शेतकरी वर्गामध्ये घाबरट पसरली आहे. खोकुर्ले गावामधील शेतकरी व दुग्धव्यवसाय करणारे नागरिक या चिंतेने धास्तावले असून जनावरांची वैरण व शेतकाम करण्यास घाबरत आहेत.यामुळे आपण याबाबत गांभीर्याने लक्ष घालून सदर बिबट्या पकडून योग्य ठिकाणी सोडण्यात यावा. बिबट्याने नागरिकावर हल्ला केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.याबाबत आपण तात्काळ कार्यवाही करून बिबट्यास पकडून योग्य ठिकाणी सोडण्यात यावा.

याबाबतचे निवेदन वनकर्मचारी संग्राम पाटील, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील यांना ग्रामस्थानच्या वतीने देण्यात आले.यावेळी सरपंच सुनिता कांबळे, रामचंद्र पाटील, बाजीराव पाटील, रंगराव पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, पोलिस पाटील कैलास इंजर, विष्णू पाटील, अजित पाटील, रामचंद्र हरुकले, बाबुराव कांबळे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.