मुंबई: महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत साडी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून ही योजना राबवण्यात येणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी एक साडी भेट दिली जाईल. यामुळे गरीब कुटुंबांना सणासुदीला गोडधोडासोबतच घरातील महिलांना नवीन साडी परिधान करून सण साजरा करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अंतरिम बजेट सादर करताना ही घोषणा केली होती.विविध सणानिमित्त रेशनिंग दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अल्पदरात देण्याचे जाहीर केले होते.
शिवजयंती निमित्त वितरित करण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहोचला आहे. या रेशन दुकानात आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने ही साडी मिळणार आहे.