अंबाबाई मंदिरासाठी एक हजार कोटीच्या निधीची तरतूद करावी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: कोल्हापुरातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा तयार असून त्यास तत्काळ मंजुरी देऊन एक हजार कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना आराखडा तपासून सादर करण्याचे आदेश दिले.

अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या वाढत असून दररोज देशभरातून 25 हजारपेक्षा  जास्त  भाविक या मंदिराला भेट देत असतात. इतर सुट्ट्यांत रोज लाखावर भाविक असतात. त्या तुलनेत मंदिर परिसरातील उपलब्ध सोयी-सुविधा तोकड्या पडत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर असून, आजूबाजूला मोठ्या बाजारपेठा व निवासी संकुले आहेत. दुकानदार व फेरीवाल्यांनी परिसर गजबजलेला आहे. सोयी-सुविधांसह भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. वाराणसी व मथुरा येथील मंदिरांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिराचा विकास करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

🤙 9921334545