केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ; माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

कोल्हापूर: बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासह
विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर मागे घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध सहा मागण्यांपैकी दोन मागण्या शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे अभिवचन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील बस सेवा ठप्प झाली होती. याचा परिणाम विद्यार्थी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला होता. ही बाब ध्यानात घेऊन माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केएमटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल असा विश्वास यावेळी माजी आमदार अमल महाडिक आणि सत्यजित कदम यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेवेळी दिला होता. त्यानंतर प्रशासनासोबत चर्चा करून मागण्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात आल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला.

यावेळी केएमटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत खासदार धनंजय महाडिक , माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचे आभार मानले.