मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अधिकाधिक तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सेल्फी काढावेत या उद्देशाने सर्व विद्यापीठे आणि कॉलेजांनी त्यांच्या आवारात मोक्याच्या ठिकाणी पंतप्रधानांची छबी असलेले सेल्फी पॉइंट्स तयार करावेत, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.
यूजीसीने १ डिसेंबर रोजी सर्व शिक्षण संस्थांना पत्र लिहून वरीलप्रमाणे आदेश दिले. देशभर सर्व रेल्वे स्थानकांवर, रस्त्यांवर या प्रकारचे सेल्फी पॉईंट बसविण्यात आले आहेत. आता यात शैक्षणिक संकुलांचाही भर पडणार आहे. भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा अभिमान बाळगता यावा, यासाठी हे सेल्फी पॉईंट बसविण्यात यावे, असे यूजीसीचे म्हणणे आहे. तरुणांची ऊर्जा आणि उत्साह वापरण्याची ही अनोखी संधी आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी व विद्यापीठांनी तरुणांना सेल्फी काढण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी पत्रात केली आहे.
हे सेल्फी पॉईंट कसे असावे, याचे डिझाईनही देण्यात आले आहे. त्याचा लेआऊट थ्रीडी असावा. त्यासाठी शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, विविधतेत एकता, स्मार्ट इंडिया, भारतीय ज्ञान प्रणाली, बहुभाषिकता, भारताने उच्चशिक्षण, संशोधन आणि नावीन्यता या क्षेत्रात केलेली प्रगती असे विषय निवडायचे आहेत. शिक्षणसंस्थांनी मोक्याच्या ठिकाणी ही सेल्फी पॉईंट लावायची आहेत आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यासह अभ्यागतांनाही सेल्फी घेण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे.