बिद्रीच्या लय भारी टीमला हद्दपार करा – खा.धनंजय महाडिक

सरवडे(प्रतिनिधी) : कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असतो.कारखाना कार्यस्थळावर अद्ययावत शाळा, रुग्णालय, विविध सामाजिक उपक्रम राबवून कारखान्याचा कारभार सभासदाभिमूख करता येतो. परंतु या लय भारी कारभारी मंडळींनी बिद्री सारख्या सहकारी कारखान्यात चुकीच्या पध्दतीने आकड्यांची जुळवाजुळव केली आहे. सत्ताधारी मंडळीनी जेवढा नफा तेवढाच तोटा दाखवून सभासदांची दिशाभूल करीत कोट्यवधी रुपयांचा ढपला पाडला याची जाणीव सुज्ञ सभासदांना झाली आहे.

त्यामुळेच आता बिद्रीत परिवर्तन अटळ असून परिवर्तन आघाडीची सत्ता आल्यास बिद्रीचे नंदनवन करू असे प्रतिपादन खा.धनंजय महाडिक यांनी केले सरवडे ता.राधानगरी येथे संपन्न झालेल्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष शंकरराव पाटील होते.

यावेळी बोलताना राजे समरजिंतसिह घाटगे म्हणाले, दुधसाखर विद्यानिकेत ही बिद्री कारखान्याची मातृसंस्था आहे परंतु आज या शिक्षण संस्थेचे अवस्था या लय भारी कारभारी मंडळींनी दयनीय करून ठेवली आहे.एफआरफी प्रमाणे दर देणारे जादा दर दिल्याचा कांगावा करीत आहेत. मुश्रीफ आणि के.पी.पाटील या जोडीने भ्रष्ट कारभार करून कारखाना लुटण्याचा प्रयत्न केला आहे.या भ्रष्ट प्रवृतीला कायमचे हद्दपार करण्यासाठी परिवर्तन आघाडी तयार झाली असून या आघाडीची सत्ता आल्यास बिद्रीचा कायापालट करून दाखवू.

आ.प्रकाश आबिटकर म्हणाले, बिद्री ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे आम्ही लय भारीवाल्यांचा बिद्रीतील भोगस कारभाराचा पंचनामा केल्याने विरोधक दिशाभूल करणारी वक्तव्य करीत आहेत. परंतु बिद्रीची सत्तापालट करण्यासाठी सभासद पुढे सरसावले आहे. त्यामुळे बिद्रीत परिवर्तन अटळ आहे.

यावेळी ए.वाय.पाटील म्हणाले, राधानगरी तालुक्याच्या स्वाभिमानीला दुखवण्याचा प्रयत्न आमच्या पाहूण्यांनी केला असून राधानगरीकर परिवर्तन आघाडीला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्याला चोख उत्तर देतील.

स्वागत प्रास्ताविक विठ्ठलराव खोराटे यांनी केले. यावेळीसिताराम खाडे ,अरुण जाधव, प्रभाकर पाटील, वसंतराव पाटील, यांची भाषणे झाली. यावेळी मानसिंग पाटील, आर.एस.साठे, सुभाष चौगले, सुभाष पाटील, संजय पाटील, बाबुराव लाड,विष्णू जाधव, कुंडल पाटील, भिमराव कांबळे, सर्जेराव पाटील, पी.एस.खोत, तुकाराम पाटील, नामदेव मुसळे यांच्यासह कासारपुतळे, कासारवाडा ऐनी आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन रणजित जठार, नंदु निर्मळे तर आभार माजी संचालक नेताजी पाटील यांनी मानले

निडव काढा लावण करा
गेली अनेक वर्षे सत्तेत बसवून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना वारयावर सोडणाऱ्या के.पी.पाटील यांना आता सत्तेवर पाय उतार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिद्रीत परिवर्तन करून निडव काढा आणि लावणं करा असे आवाहन ए.वाय.पाटील यांनी केले.