बेंगलोर मध्ये कथीतरीत्या जवळपास 900 बेकायदा गर्भपात…

बंगळुरू – गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत.म्हैसूर शहरातील रुग्णालयात हे स्त्रीभ्रूणहत्या रॅकेट सुरू होते.

गेल्या महिन्यात मंड्यातील शिवलिंगे गौडा, नयन कुमार यांना अटक करण्यात आली. तेव्हा हे दोघे गर्भवतीस कारमध्ये गर्भपातासाठी घेऊन जात होते. चौकशीनंतर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. मुलगी नको असलेली दाम्पत्ये त्यांच्याकडे येत. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये गर्भ मुलीचा असल्याचे आढळल्यास गर्भपात केला जाई. 

३०,००० रुपये आरोपी प्रत्येक बेकायदा गर्भपातासाठी आकारत.

सहा जणांना अटक

– डॉ. बल्लाळ आणि निसार यांच्या अटकेने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे. या दोघांना गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले होते. 

– रुग्णालयाच्या व्यवस्थापक मीना व रिसेप्शनिस्ट रिझमा खान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक झाली.

गूळ युनिटमध्ये होत होती लिंगनिश्चिती

या दोघांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. लिंगनिश्चिती व स्त्रीभ्रूणहत्येसाठी चक्क एका गूळ युनिटचा अल्ट्रासाऊंड स्कॅन सेंटर म्हणून वापर केला जात होता.

चौकशीत ही बाब समोर येताच पोलिसांनी गूळ युनिटवर छापा टाकून स्कॅन मशीन जप्त केले. गेल्या तीन वर्षांत आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांनी म्हैसूर रुग्णालयात सुमारे ९०० बेकायदा गर्भपात केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.