वर्ल्डकप नंतर आता बीसीसीआय वर अनेक प्रश्न उपस्थित..

मुंबई: सचिन तेंडुलकरच्या वानखेडेवरील पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू, वर्ल्डकप फायनलवेळी पवारांना ना आयसीसीने ना बीसीसीआयने साधे निमंत्रणही दिले नसल्याचे समोर येत आहे.महत्वाचे म्हणजे शरद पवार हे आयसीसीचे माजी अध्यक्ष आहेत. यामुळे पवारंना मुद्दामहून निमंत्रण दिले गेले नाही की विसरले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

भारताने वर्ल्डकप गमावला आणि आता वेगवेगळे वादाचे मुद्दे समोर येऊ लागले आहेत. स्पर्धा आयसीसीची असली तरी बीसीसीआयने ती आयोजित केली होती. भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनाही या फायनलला बोलविण्यात आले नव्हते. आता दुसरे नाव शरद पवारांचे समोर येत आहे. 

कपिल देव यांनी मध्यंतरीच्या काळात एका वेगळ्या लीगला पाठिंबा देत बीसीसीआयला समकक्ष क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. परंतू, ते प्रयत्न फेल गेले होते. यामुळे कपिल देव यांना बीसीसीआयच्या कार्यक्रमांना बोलविले जात नाही. परंतू, वर्ल्डकप हा आयसीसीचा होता, कपिल देव यांनी भारताला पहिला वर्ल्डकप जिंकवून दिला होता. ते कप्तान होते. तरीही त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते. 

आता शरद पवार हे तर आयसीसीचे माजी अध्यक्ष होते. या दोघांनाही बीसीसीआयचे जाऊद्या, पण आयसीसी कसे विसरली असा सवाल आता विचारला जात आहे. शरद पवारांना मोदी स्टेडिअमवरील या सामन्यासाठी निमंत्रण नव्हते, असे एका मराठी वृत्तवाहिनीला सुत्रांनी माहिती दिली आहे. यामागे काही राजकारण होते का, असा सवालही विचारला जात आहे.