लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला 

मुंबई: फूटलेली महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये सहभागी झालेले मविआतील दोन पक्षांचे दोन गट अशी काहीशी विचित्र राजकीय खिचडी राज्याच्या राजकारणात पहायला मिळत आहे.

असे असताना कोण कोणाचा उमेदवार, कोण कोणाला शह देणार, लोकसभा निवडणुकीबरोबरच येत्या विधानसभा निवडणुकीतही एकमेकांना चितपट करण्याचे राजकारण रंगणार आहे.यातच कोणती जागा कोणाकडे जाणार यावरूनही बराचसा सस्पेंस आहे. असे असताना काँग्रेसच्या राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी पहिल्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली आहे. 

मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एकसंध काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. शिवाय त्यांच्यासोबत मित्रपक्षही आहेत. अशातच या तीन पक्षांना शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बलाढ्य भाजपासोबत दोन हात करायचे आहेत. यामुळे येती निवडणूक चुरशीची ठरणार आहे. असे असताना कोणत्या पक्षाला किती जागा, कोणकोणत्या जागा याचा तिढा अद्याप सुटलेला नाहीय, अशातच सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याचे म्हटले आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मला जे करता येईल ती मदत मी करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

२०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. वंचितकडून प्रकाश आंबेडकर हे देखील उभे होते, यामुळे शिंदे यांना विजय मिळविता आला नव्हता.