कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी मुदतवाढ देण्याची कृती समितीची मागणी…

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज विमानतळ कृती समितीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाच्या मुदतवाढीच्या मुद्दयावर चर्चा झाली.

काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या चौसष्ठ एकर जमिनी पैकी एकतीस एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.संंबंधित खातेदारांना जमिनी ताब्यात देण्याबाबत महसूल विभागाने नोटीस दिल्या आहेत. भूसंपादनासाठीची 20 सप्टेंबर पर्यंतची वाढीव मुदतही संपल्याने जागा मालकांना जागेचा मोबदला कमी मिळणार असल्याकडे खातेदारांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे भूसंपादनासाठी मिळालेली वाढीव मुदतही संपल्याने उर्वरित जमिन मालकांना अपेक्षित रक्कम मिळणार नाही. त्याच बरोबर 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असल्याचं या बैठकीत सांगितले.

यावर कृती समितीने भूसंपादनासाठीच्या मुदतवाढीसाठी विमानतळ प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाला पाठवू अशी ग्वाही दिली.

या बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार संजय मधाळे, तलाठी संतोष भिऊंगडे त्याच बरोबर विमानतळ कृती समितीचे विलास सोनुले, अरुण सोनवणे, अनिल सोनुले यांच्यासह जमिन मालक उपस्थित होते.

🤙 9921334545