बेनिक्रे लघु प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठी प्रयत्न करा : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: बेनिक्रे ता. कागल येथील लघु प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे सर्व छोटे-मोठे नाले मशिनरीद्वारे वळवून पाणी प्रकल्पात आणा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांची बैठक झाली. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती स्मिता माने, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बागेवाडी, उपअभियंता महेश चव्हाण तसेच जोतिर्लिंग पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पाणलोट क्षेत्रात सुधारणा व कालव्याच्या अस्तरीकरणासह वितरण व्यवस्था सुधारा. पाणलोट क्षेत्राच्या व तलावाच्या वितरण व्यवस्थेमध्येही सुधारणा करा.

याबाबत अधिक माहिती अशी, बेनिक्रे लघु प्रकल्पाचे काम सन १९६९ साली होवून ६५ द. ल. घ. फू. साठवण क्षमता आहे. लाभक्षेत्र ४४५ हेक्टर असून सिंचनक्षेत्र २८६ हेक्टर आहे. रब्बी हंगामासाठीच्या या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३.६५ चौ कि.मी. असून ५० टक्के अवलंबित पर्जन्यमान १४०० मी. मी. आहे. सन १९८९ पासून सन- २००५, २००६, २०१९, २०२१ अशा चार वेळाच पूर्ण भरलेला आहे. सन २००५ ला जोतिर्लिंग पाणीवापर संस्था स्थापन होवून योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागातून उसपिकाचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली. सध्या २५० हेक्टर उसपिक घेण्यात येत आहे. उसपिकासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेणे भरणे गरजेचे आहे. त्यामुळे; शासनाकडून विशेष बाब म्हणून वेदगंगा नदीतून ३.८२ द. ल. घ. मी. (१३४.९० द. ल. घ. फू.) इतक्या पाण्याचा उपसा करण्यास व तलावात साठवण करून वितरणास मान्यता मिळाली. मागणीनुसार नदीतून पाणीउपसा करण्यात येतो.*पाण्याचा अपव्यय टाळूया……..* या लघु प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याची वितरण व्यवस्था कालव्याद्वारे असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी संधानकामध्ये अस्तरीकरण किंवा बंदिस्त पाइपने करण्यासाठीचे अंदाजपत्रक विस्तार व सुधारणांमधून विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचनाही, मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.