भगवा चौकात छ. शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी परवानगी देण्याची मागणी

कोल्हापूर : कसबा बावडा येथील भगवा चौकात श्रीराम सोसायटी व ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीमुळे कसबा बावडास ऐतिहासिक, छ. राजाराम सहकारी साखर कारखाना मुळे औद्योगिक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलामुळे कसबा बावडा गावाचे नाव राज्य, देश व जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहे.

शेतकर्यासाठी कार्यरत असणाऱ्या श्रीराम विविध कार्यकारी सेवा संस्था व ग्रामस्थांच्यवतीने लोकवर्गणीतून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करणेचा येथील सर्व समस्त शिवशाहू प्रेमी व ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीची दखल घेवून कोल्हापूर शहराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार भगवा चौक या ठिकाणी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने पुतळा उभारण्यात येणार आहे. या सदर्भात आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय नियम, अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही तयार असून हा पुतळा उभारणीसाठी परवानगी मिळावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन हिंदुराव ठोंबरे व सर्व संचालक, शिवशाहूप्रेमी उपस्थित होते.