जिल्हा वार्षिक योजनेचा निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करा: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022- 23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना कामांची आढावा बैठक आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री केसरकर यांनी चालू वर्षी झालेली कामे व सुरु असलेल्या कामांचा आढावा घेवून कामाची सद्यस्थितीची माहिती विविध यंत्रणांच्या प्रमुखांकडून घेतली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून होणारी कामे गतीने पूर्ण करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. *इन्फ्लुएन्झा आजाराच्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा*पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले, नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लुएन्झा संसर्ग एच -३ एन- २ आजाराच्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केल्यास तो लवकर बरा होतो. इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा. लसीकरण पूर्ण करुन घ्या. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करा, पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेवून औषध सुरु करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबाबत व्यापक जनजागृती करा, अशा सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी दिल्या.कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या हेरिटेज वास्तूंचे संरक्षण, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासंबंधीची संकल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांच्या सहकार्याने त्या त्या प्रभागातील हेरिटेज वास्तूंची देखभाल, दुरुस्ती करता येईल. हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्याची कार्यवाही करु, असे पालकमंत्री श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे व सद्यस्थितीची माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका कामांची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तर जिल्हा परिषदेच्या कामांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022 -23 साठी 425 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आत्तापर्यंत 320.22 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. आज अखेर 242.89 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरी झाल्या असून, कार्यान्वयीन यंत्रणांना आत्तापर्यंत 187.08 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत शासनाच्या सूचनेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे 25.70 कोटी रुपये निधी तसेच लंपी रोग नियंत्रणासाठी 3 कोटी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे यंत्र सामुग्री व साधनसामग्री खरेदीसाठी 8.28 कोटी, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी 2 कोटी व नगरपालिका, महानगरपालिकेत नगरोत्थान योजनेअंतर्गत 11 कोटी इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी दिली.