सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना अडचणीत आणण्याचे षडयंत्र मोडून काढूया: गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांचे आवाहन

कागल: आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत बोलताना गोकुळ दूध संघाचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील. व्यासपीठावर उपस्थित प्रवीणसिंह पाटील, प्रताप उर्फ भैया माने, प्रा. डी. डी. चौगुले, वसंतराव यमगेकर, सतीश पाटील, वसंतराव धुरे, सिद्धार्थ बन्ने आदी प्रमुख.

कागल :अफाट इच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे. या कारखान्याला काही दृष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत आहेत. तमाम शेतकरी आणि कामगारांच्या चुलीत पाणी ओतण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. गलिच्छ राजकारणातून चालू असलेले हे घाणेरडे षडयंत्र मोडून काढूया, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांनी केले.

राजकीय विद्वेशातून सुरू असलेल्या या कटकारस्थानामुळे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांची सवलतीची साखर व मिळणाऱ्या सेवा -सुविधा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तयारीच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. पाटील पुढे म्हणाले, प्रवीणसिंह पाटील म्हणाले, सगळेच साखर कारखाने शेतकऱ्यांकडूनच पैसे उभा करून कारखाना उभारतात. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनीही साखर कारखाना उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. यात त्यांनी काय चूक केली? अजूनही आमदार मुश्रीफसाहेब साहेब यांनी ठरविले तर एकाचवेळी ते शंभर कोटी रुपये गोळा करू शकतात.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या विश्वासाचापोटीच शेतकऱ्यांनी हजारो कोटी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी दिले आहेत. विरोधक गावागावात काही सह्या गोळा करण्याचे कुभांड करीत आहेत. अशा सह्या करणाऱ्यांच्या साखरेसह सर्व सोयी-सुविधा बंद करून टाका. कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी सभापती राजेश लाटकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरिबांचे नेतृत्व आहे, हे नेतृत्व जोपासण्याची गरज आहे.

*” जनता गप्प बसणार नाही……“*राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा जन्म श्री. रामनवमीला झाला. ते तमाम माता-भगिनींचे पुत्र आणि बंधू आहेत. त्यांना अडचणीत आणण्याचे कुटिल प्रयत्न सुरू आहेत. असे काही झाल्यास जनता गप्प बसणार नाही.

*”कुजबुजीला बळी पडू नका…..”*राजेश लाटकर म्हणाले, जिथे समोरून लढता येत नसेल तिथे समोरच्याविषयी कुजबूज करीत राहणे, ही आरएसएसची प्रवृत्ती आहे. अशा कुजबुजीला बळी पडू नका, हुकूमशाही मोडून काढूया.

माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, सेनापती कापशी खोरे विकासापासून वंचित खोरे होते. आमदार मुश्रीफसाहेबांच्या माध्यमातून सरसेनापती कारखाना उभारून व हरितक्रांती आणून या खोऱ्यात कृषी -औद्योगिक क्रांतीची नांदी सुरू झाली. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव कोतेकर म्हणाले, संघर्ष आम्हाला नवीन नाही. तो आमच्या पाचवीलाच पूजलाय.

यावेळी राष्ट्रवादीचे गडहिंग्लज शहराध्यक्ष प्रा. सिद्धार्थ बन्ने, संभाजीराव तांबेकर, विजय काळे, कागल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ता पाटील -केनवडेकर, शिवाजी पाटील यांचीही मनोगते झाली.यावेळी व्यासपीठावर दलितमित्र प्रा. डी. डी. चौगुले, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, बाळासाहेब तुरंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, शिरीष देसाई, प्रा. सिद्धार्थ बन्ने, नामदेव पाटील- मळगेकर, मारुतीराव घोरपडे, वसंतराव यमगेकर, प्रकाशभाई पताडे, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, गुंडेराव पाटील, जयदीप पोवार, नितीन दिंडे, सतीश घाडगे, विवेक लोटे, संजय फराकटे, बाळासाहेब देसाई- मंचेकर, सदानंद पाटील, संतोष कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी यांनी केले. आभार जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे यांनी मानले.