देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल असा पंचमहाभूत लोकोत्सव – मंत्री नारायण राणे

कोल्हापूर : सिध्दगिरी कणेरी मठ परिसरात प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून शिकून घेऊन त्याचा उपयोग मी राज्य आणि देश पातळीवर करणार आहे. देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा हा पंचमहाभूत लोकोत्सव आहे, असे गौरवोद्गार सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले.

ते पंचमहाभूत लोकोत्सवाच्या समारोप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, कर्नाटक राज्याचे विधान परिषद सभापती बसवराज होराठी, कर्नाटक येथील खासदार अण्णासाहेब जोल्ले, कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, आमदार महेश शिंदे, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन कणेरी मठाचे विश्‍वस्त उदय सावंत यांनी केले.

प्रास्ताविक आमदार महेश शिंदे यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, ‘‘प्रकृती आमच्यासाठी माता आहे. पुढच्या पिढीला आपल्याला चांगली हवा, पाणी, वायू द्यावयाचा असेल, तर प्रदूषण रोखण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनशैलीत परिर्वतन घडवावेच लागेल. मानवाने त्याला मिळणार्‍या क्षणिक भौतिक सुखासाठी पंचमहाभूतांवर आक्रमण केले आहे ,भविष्यात कुंटूबातील संवाद हा पर्यावरण संरक्षणा साठी होऊन त्यांची समाजा पर्यंत व्याप्ती वाढावी ‘ अशी अपेक्षाही त्यांनी आग्रहाने व्यक्त केली . पंचमहाभूत लोकोत्सवातून बोध घेऊन ते कृतीत आणण्याचा निश्‍चय करा ! – असे प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी सांगितले.शेतकर्‍यांनी सातत्याने एकच पीक न घेता पीक पालटून शेती करणे, शेतीत मोठ्या प्रमाणात झाडे लावणे, सेंद्रीय शेतीवर भर देणे, नागरिकांनी घरी किमान १० झाडे लावणे, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक गोळा करून ते एकत्र करून शाळेत देणे, महिलांनी पाण्याची बचत करणे, शेतकर्‍यांनी ‘गोबर गॅस’चे संयंत्र वाढवून गाव ‘एल्.पी.जी.’ मुक्त करणे यांसह अनेक उपाय करणे आवश्यक आहे. हा महोत्सव एक प्रारंभ असून पंचमहाभूत लोकोत्सवातून बोध घेऊन ते कृतीत आणण्याचा निश्‍चय करा, असे आवाहन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांनी याप्रसंगी केले.

या लोकोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवर भरीव काम केलेले जिल्हाधिकारी राहूल रेखावार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण , अधिकारी यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी हतिष बुटाले संपादीत ‘तुम्ही आम्ही । पालक-सामाजिक पालकत्व’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. रात्री उशिरापर्यत नागरिकाची सहकुटुंब गर्दी कायम होती तर केएमटी ने विक्रमी फेऱ्या करत गंगावेश ते कणेरी मठ अशी अविरत सेवा पाच दिवस दिली एक फेरीत तब्बल 152 प्रवासी वाहतुकीचा ही विक्रम त्यांनी नोंदविला .