प्लास्टिक पासून तयार केलेल्या कपड्याचे जॅकेट पंतप्रधान मोदींना भेट..

नवी दिल्लीः  संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक विशेष प्रकारचं जॅकेट घालून संसदेत प्रवेश केला. मोदींनी घातलेल्या या निळ्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याचं कारणही तसंच आहे. हे जॅकेट विशेष ब्रँड किंवा विशेष डिझायनरमुळे चर्चेत नाहीये. तर यासाठी वापरण्यात आलेला कपडा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही-आम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटल्या एका पाणी पिऊन फेकून देतो, त्याच प्लास्टिकपासून या जॅकेटचा कपडा तयार करण्यात आला आहे. इंडियन ऑइल कंपनीतर्फे नुकतंच हे जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलं.

बंगळुरू येथे इंडियन ऑइल कंपनीतर्फे एनर्जी वीक साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सप्ताहाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांना हे जॅकेट गिफ्ट करण्यात आलं. प्लास्टिकच्या एकदा वापरून फेकून देण्यात आलेल्या बाटल्यांपासून हे जॅकेट तयार करण्यात आलंय. याच कपड्यापासून आता इंडियन ऑइल कंपनीचे कर्मचारी तसेच सहायकांना युनिफॉर्म दिला जाणार आहे. पेट्रोल पंपावरील सहाय्यकांसाठी ही खास योजना कंपनीने आखली आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने देशवासियांना एक सूचक संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जॅकेट परिधान केल्याचं सांगण्यात येतंय.