गित्तेंवर कडक कारवाई करा;जि.प.अभियंता संघटनेचे निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी): आंद्रुड ता.जि.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता खासेराव गलांडे यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या गित्ते यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांना देण्यात आले.

आंद्रुड ता.जि.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता खासेराव गलांडे यांनी चुकीचे व नियमबाह्य कामे करण्यास नकार दिला असता त्यांना कार्यालयीन कामकाज करीत असताना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केल्याच्या घटनेचा राज्यभरात काळ्या फिती लावून तीव्र निषेध करण्यात येणार आहे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या गित्ते यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात यावे, तसेच गलांडे व कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हा परिषद उस्मानाबादचे कनिष्ठ अभियंता खासेराव गलांडे यांनी अवास्तव अंदाजपत्रक करण्यास नकार दिल्याने व यापुर्वीही न केलेल्या कामाचे देयक देण्यास नकार दिल्यामुळे ज्ञानेश्वर गीत्ते या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी गलांडे यांना कार्यालयीन कामकाज करीत असतांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची व गलांडे यांच्यासह कुटुंबीयांना धमकावल्याची घटना घडली आहे.

गलांडे यांनी विकास कामांची अंदाजपत्रके तयार करतांना गित्ते यांच्या म्हणण्यानुसार अवास्तव तरतुदी करण्यास नकार दिल्यामुळे तसेच इतर कंत्राटदाराच्या नावाने गित्ते यांनीच केलेल्या विकास कामांचे मुल्याकंन करतांना, न झालेल्या कामाचे देयक देण्यास नकार दिल्याने, चिडुन जाऊन सदर व्यक्तीने गलांडे यांना कार्यालयातच शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर घटनेबाबत गलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीत आरोपी विरोधात कलम 353, 332,504,506 अन्वये गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्या गीत्ते या आरोपीस मा. न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीसुनावली आहे. सदर घटनेबाबत तातडीने केलेल्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे संघटनेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

एका सरळमार्गी व शासनाचे हित जपणा-या अभियंत्याला धमकावुन व शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा व दहशत निर्माण करण्याच्या घटनेचा जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र (राज्यस्तर) च्या वतीने दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यभरात काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात येत आहे.

गित्ते या व्यक्तीने यापुर्वीही जिल्हा परिषदेच्या विवीध विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातत्याने शिवीगाळ करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर इसमावर कायदेशीर कारवाई करणेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने यापुर्वीही प्रशासनास निवेदने देण्यात आली आहेत. तथापी कडक कायदेशीर कारवाई न झाल्याने अभियंत्यांला कार्यालयातच शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न करण्यापर्यंत संबंधितांची मजल गेली असुन अभियंत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा धमकावण्याच्या प्रकारामुळे संबंधित अभियंत्याचे व कुटुंबीयांचे मनःस्वास्थ्य बिघडले असुन सर्वजन दहशतीमध्ये आहेत.

उपरोक्त बाबींची गांभीर्याने दखल घेऊन आरोपी गित्ते यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असल्याचे सिद्ध होत असल्याने गित्ते यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात यावे. तसेच सदर व्यक्तीपासुन कनिष्ठ अभियंता गलांडे व त्यांच्या कुटुंबीयांना अपाय होऊ नये यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

सदरचे निवेदन देताना प्रदीप हुपरे,आर.पी.भोंगाळे,अंकुश पवार,संजय काळे,तुषार देवरे,निखील काटकर,आदी उपस्थित होते.