देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील, पण देशात मोदींचं नाणं चालतच राहील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरेंनी आज (रविवारी) दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ‘नरेंद्र मोदी घासलं गेलेलं नाणं आहेत’ असा उल्लेख केल्याची चर्चा आहे. यावरून भाजपाकडून आक्षेप नोंदवण्यात येत असून खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे अंतरिम आदेश दिले, यात आपल्याला काहीही आश्चर्य वाटलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “याआधी गेल्या २५ वर्षांमध्ये कोणत्याही राज्यात एखाद्या पक्षात फूट पडली आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रकरण गेलं तेव्हा निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश देत चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवलं आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन कायद्यानुसार ज्याचा हक्क असतो, त्याला ते मिळतं.आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं. मला अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल, तेव्हा एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल”, असं ते म्हणाले.