कोल्हापुरात गुंडांचा पाठलाग करुन दगडाने ठेचून खून

कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एकदा गॅंगवार पेटले असून दौलतनगरमधील रेकॉर्डवरील गुंडाचा यादवनगरमध्ये पाठलाग करून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. संदीप अजित हळदकर ऊर्फ चिन्या (वय २५) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विविध गंभीर गुन्ह्यांत चिन्याला यापूर्वी अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. त्याच्याविरुद्ध मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे १० ते १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली होती.

शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चिन्या हळदकर आणि संशयित हल्लेखोरांच्यात दौलतनगर परिसरात वादावादी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. या वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळाला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत महावितरणच्या कार्यालयाजवळ त्याला गाठले. चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केल्याने तो रस्त्यातच निपचित पडला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरात मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी केली होती. या घटनेने राजारामपूरी परिसरासह शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.