कोल्हापूर:चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनीत घडली आहे.

रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दीपाली गणेश कदम (32) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पत्नीचा खून करणारा पती गणेश भगवान कदम (38) याला पंचगंगा पोलीसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली, तिच्या 2 मुली स्वरा (6) आणि मुलगा श्री(8) तसेच पती गणेश असे हे कुटुंब योगेश्वरी कॉलनीत राहत होते. 10 वर्षांपूर्वी गणेश आणि दीपाली यांचा प्रेमविवाह झाला होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते.
रविवारी सकाळी गणेशने दीपालीला फोन करून घरी बोलाविले. त्यानंतर तिच्याशी वाद घालून तिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर गणेशने स्वतः दीपालीच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पंचगंगा पोलीस करत आहेत.
