केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; धनंजय महाडिक यांना संधी मिळणार ?

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये आले असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. फेरबदलात पश्चिम महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर ७ जुलै २०२१ रोजी मंत्रीमंडळात पहिल्यांदा फेरबदल करण्यात आला होता. यावेळी १२ मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. यात महाष्ट्रातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा समावेश होता. तर विस्तारात यादीत महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड व भारती पवार यांचा समावेश झाला होता.

आता सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड देत भाजपच्या विजयाची ज्यांनी गुढी उभारली होती त्या धनंजय महाडिक यांचे मंत्रिपदी नाव निश्चित मानले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत अल्पमतात असूनही दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीची मते फोडत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर आघाडी सरकार कोसळले होते. धनंजय महाडिक यांच्या रूपाने महाविकास आघाडीला सुरुंग लावला होता.

धनंजय महाडिक यांच्या विजयाने दक्षिण महाराष्ट्रात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. महाडिक कुटुंबीयांचे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या नावासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या फेरबदलात धनंजय महाडिक यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास कोल्हापूरला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी मिळणार आहे.