बांधकाम कामगारांना भोजनाऐवजी रोख रक्कम द्यावी : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या मागणीप्रमाणेच मध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत आहार देण्याऐवजी एकवेळच्या जेवणाची रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचेकडे करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

कूर (ता.भुदरगड) येथे विश्वक्रांती कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य कोनवडे संस्थेमार्फत आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आबिटकर म्हणाले, कामगारांना माध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत बाराशे कॅलरीजचे एकवेळचे अन्न पुरविण्यात येते. परंतू प्रत्यक्षात मात्र जिल्हा स्तरावरुन ठेकेदार यांचेमार्फत पुरविण्यात येणारा आहार निकृष्ठ असल्याबाबत कामगारांच्या तक्रारी आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींही शासनाकडे तक्रारी दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टी गंभीर स्वरुपाच्या असून कामगारांच्या जिवीताशी खेळ करणाऱ्या आहेत. याबाबत कामगारांच्या मागणीप्रमाणेच मध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत आहार देण्याऐवजी एकवेळच्या जेवणाची रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचेकडे करणार आहे.

आबिटकर म्हणाले, शासनाच्या विविध योजनेचा लाभ असंघटित बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मिळावा म्हणून कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे मजुराला हक्क प्राप्त होणार आहे. कामगारांनी संघटीत राहून सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. बांधकाम कामगारांच्या न्याय हक्काकरिता मी सदैव त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बांधकाम कामगारांना पेटी व कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी युवानेते विरेंद्र मंडलिक, संजय गांधी समिती राधानगरीचे अध्यक्ष अरुणराव जाधव, माजी उपसभापती अजित देसाई, अशोकराव फराकटे, बारवेचे उपसरपंच दिगंबर देसाई, शरद किल्लेदार, रावसाहेब पाटील, विश्वक्रांती युनियनचे संस्थापक समाधान मोरे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सदस्य संभाजी डकरे, अमर कौलकर, तानाजी शाहीर, दशरथ पाटील, साताप्पा पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक नेताजी सारंग यांनी केले.