शिवसेनेची आता ‘यांच्या’बरोबर युती; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्याशी युती करत असल्याचे सांगताना लढावय्या सहकाऱ्यांचे स्वागत असा उल्लेख केला. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे ठाकरेंनी म्हटले. शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही असे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले.