ठाणे : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे? गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,” अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदे आज उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांना संबोधून भाषण केलं. “शेतकरी, कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचंही आहे.
“आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली दीड महिन्यापूर्वी. तशी हंडी कठीण होती ना आणि खूप उंच होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे फोडली हंडी. बाळासाहेब, दिघेसाहेबांच्या आशिर्वादामुळे फोडली. ५० थर लावले,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे सरकार फक्त शेतकरी, कष्टकाऱ्यांचं नाही तर गोविंदांचंही आहे. आम्ही कबड्डी, खो-खोप्रमाणेच दहीहंडीलाही खेळाचा दर्जा दिला. प्रताप सरनाईक याप्रकरणी सतत पाठपुरावा करत होते. अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला. सोबतच, आम्ही गोविंदांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दहीहंडीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. तर, अपघात घडल्यास गोविंदांसाठी विमाही जाहीर केला आहे. तसेच, पुढच्यावर्षीपासून प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.”
मर्यादा वगैरे बस झाल्या. दोन वर्षे मर्यादा, नियम पाळले. नियम तर पाळले पाहिजेत. गणपती हा आपला दैवत आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण गणेशोत्सव आहे. त्यामुळे नियम शिथिल केले. पैसेही माफ केले. किती पैसे मिळणार आहेत त्यातून. दोन अडीच वर्षांत आपण निर्बंधात होतो. पण विघ्नहर्त्यांने आपले विघ्न दूर केले. मोठ्या धूमधडाक्यात सण साजरा करूया. नियम पाळून सर्व साजरं करूया, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.