समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला असून नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

जे केले आहे त्यांचे परिणाम भोगावे लागतील, या आशयाचा मेसेज समीर वानखेडे यांना ट्विटरवर आला आहे. मेसेजमध्ये “तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे,” असे लिहिले आहे. धमकीचा संदेश मिळाल्याने समीर वानखेडे यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. अमन नावाच्या टविटर अकाऊंटवरून धमकी मिळाल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. ​​​

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र देत सरकारी नौकरी मिळवली. या प्रकरणात वानखेडे खूप अडचणीत आले होते मात्र, त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लिनचिट देण्यात आली आहे. यावेळी वानखेडे मुस्लिम असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगताना असो कोणतेच पुरावे नाही असे म्हणत हे प्रकरण फेटाळून लावले होते.