मोदींनंतर देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व; पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या

मुंबई : भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. या विषयी ब्राह्मण महासंघाने अभिनंदन करत मोठी मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा ब्राम्हण महासंघाने व्यक्त केला आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे –
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केलं आहे. ते भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याने धक्का नक्कीच बसला होता. पण आता घेतलेल्या निर्णयाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं”.

“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे.