काँग्रेसचा विचार कधीही संपणार नाही : आ. पी. एन. पाटील

भोगावती (प्रतिनिधी) : पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात टाचणीही तयार होत नव्हती. मात्र कॉंग्रेस पक्षाने देशात पायाभुत सुविधा निर्माण करून देशात विकासाची घोडदौड सुरु केली आहे. सर्वसामान्यांसाठी आधार असणारा काँग्रेसचा विचार संपवण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरु आहे. मात्र कॉंग्रेसचा विचार कधीही संपणार नसल्याचे प्रतिपादन आ.पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केले.


काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, आ.अशोकराव चव्हाण, यांच्या मार्गदर्शनानुसार आ.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेच्या समारोप प्रसंगी हळदी ता.करवीर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना आ.पाटील यांनी नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राच्या न झालेल्या घोटाळ्याचा बागुलबुवा उभा करुन केंद्र सरकार सोनिया गांधीसह गांधी कुटुंबाला ईंडीच्या माध्यमातून त्रास देत आहे. मात्र गांधी कुटुंब निरापराध आहेत. इन्कमटॅक्स, ईडी या संस्थांच्या धाकाने देश चालवू लागलेत. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते भाजपचा प्रयत्न हाणून पाडतील. असे सांगितले. कॉंग्रेसने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताची भुमिका ठेवली होती. स्वातंत्र्यावेळी देशात टाचणीही तयार होत नव्हती. काँग्रेसने अगदी छोट्या मोठ्या यंत्रांपासून विमानापर्यंतची उत्पादने भारतात सुरू केली.एकवेळचे अन्न मिळत नव्हेत, अमेरिकेतुन किडका मिलो आणून खावा लागत होता. काँग्रेसमुळे देशातून बाहेर अन्न पाठवू लागलो. काँग्रेसने नेहमी लोकांचा विकास करून मते मागितली. मात्र भाजप लोकांना त्रास देवून, अटक करण्याची भिती घालून मते मागायला लागले. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दुप्पट केल्या. घरगुती गॅस 370 रुपयांवरून 1100 रुपये केले. शेतीसाठी लागणा-या खतांसह अन्नधान्यावरही कर लावून दरवाढ केली. 23 सरकारी कंपन्या खासगी उद्योगपतीना विकल्या आहेत. त्यामुळे जगणे मुष्कील झाले आहे. महागाईमुळे सामान्य जनता व शेतकरी भरडला जात आहे,असे सांगितले. काँग्रेसने सहकारी संस्था काढल्या, शिक्षण संस्था काढल्या असून भाजपा हे सगळे मोडून काढत आहेत. आगामी काळात देशाचे भवितव्य अंधकारमय असून लोकांच्या असंतोषामुळे मोदींना देश सोडावा लागेल असे सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बी. ए. पाटील, विष्णु पाटील यांची भाषणे झाली.
प्रारंभी कांडगाव येथे पदयात्रेची सुरूवात झाली व हळदी येथे सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी.पाटील सडोलीकर,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,माजी संचालक पी.डी.धुंदरे, उदय पाटील सडोलीकर,राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.सुप्रिया साळोखे,करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील,राधानगरी कॉंग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संदीप पाटील,भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, बी. एच. पाटील, विश्वनाथ पाटील, जिल्हा समन्वयक सुशिल पाटील कौलवकर
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, एम. आर. पाटील कुरुकलीकर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक भोगावतीचे संचालक प्रा.शिवाजीराव पाटील यांनी केले तर आभार दिगंबर मेडसिंगे यांनी मानले.