जगदीप धनखड १४ वे उपराष्ट्रपती; आज घेतली शपथ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ बुधुवारी (१० ऑगस्ट) संपला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता.

संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या ७८८ आहे. त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० खासदार मतदानासाठी पात्र ठरले होते. या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते. धनखड यांना एकूण ७३ टक्के मते मिळाली होती.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते.

News Marathi Content