करनूर येथील मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांचा राजे गटात प्रवेश

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सध्या जोरदार पावसाळा सुरू आहे. गटारामध्ये साचलेली घाण साफ होत आहे. गटारीतील या पाण्याबरोबर बरोबर कागल तालुक्यात शासकीय योजनांमध्ये गोर-गरीबांकडून कमिशन खाणाऱ्यांची घाण वाहून जाऊ दे अशी मरिआई चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.करनूर (ता.कागल) येथे ई श्रम कार्ड, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमवेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून राजे गटात माजी सरपंच कविता घाटगे व ग्रामपंचायत सदस्य कुमार पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना घाटगे म्हणाले की, माजी मंत्री मुश्रीफ साहेब मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली म्हणून सांगतात. मात्र ही कामे ठराविक चारच कंत्राटदारांना त्यांच्याकडून देण्यात आली आहेत. या ठराविक जणांच्यावरच त्यांची खास मर्जी का ? हा संशोधनाच विषय आहे. ही कामे विभागून अन्य बेरोजगार तरुणांना देता आली नसती काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे धंदे बंद झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.

यावेळी जयसिंग घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहूचे संचालक युवराज पाटील,  प्रताप पाटील,माजी सरपंच आनंदा पाटील, गणपती चौगुले, कृष्णात धनगर, प्रताप पाटील, संतोष गायकवाड, तानाजी कुंभार,सचिन घोरपडे आदी उपस्थित होते. स्वागत सतीश धनगर यांनी केले. आभार विजय चौगुले यांनी मानले.

 ….हे तर लोकप्रतिनिधींचे कामच

शासनाच्या विविध योजनांचा कागल तालुक्यामध्ये लाभार्थींना लाभ मिळत आहे. मात्र कागलमध्ये काहीजण  शासकीय योजनेतून होत असलेली कामे स्वतःच्या खिशातून करत असल्याच्या भ्रमात आहेत,असा चिमटा माजी मंत्री,मुश्रीफ यांचे नाव न घेता घाटगे यांनी काढला. हे तर लोकप्रतिनिधीचे कामच आहे. त्यात वेगळे काय? अशी कोपरखळीही  मारली.