रंकाळ्यात अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके

कोल्हापूर : शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत, कोल्हापूरकरांना दाखवून दिले

संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक आमदार जयश्री जाधव यांनी घेतली होती घेतली. महापालिकेने केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती घेतल्यानंतर अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध व बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर करण्याचे ठरले होते. यानुसार आज दुपारी रंकाळा तलावात अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रात्यक्षिके सादर केली. एखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला रबरी बोटीद्वारे पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व दोरच्या साहाय्याने कसे वाचवले जाते, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी. ए. सेट, हायड्रोलिक जॅक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी उपमहापौर विक्रम जरग, शेखर पवार, संपत चव्हाण, नागेश नलवडे यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.