बिनविरोधसाठी माझी भूमिका प्रामाणिक; नार्को टेस्टला मी तयार, तुमची तयारी ठेवा : आमदार आसगावकर

पेठवडगाव : ‘कोजिमाशि’  पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका होती. त्याला सत्ताधारी नेतृत्वाने प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट पालकमंत्र्यांचा अवमान केल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. माझ्या आमदारकीच्या विजयासाठी तमाम शिक्षक बंधू भगिनींनी कंबर कसली होती. त्या निवडणुकीत तुम्ही नेमकी कशासाठी कंबर कसली होती? दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या उमेदवारासोबत शाळांना आभाराच्या निमित्ताने भेटी कुणी दिल्या. हे सर्वांना माहीत आहे. खरे- खोटे करण्यासाठी नार्को टेस्टला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. तुम्हीही या नार्को टेस्टसाठी तयारी ठेवा, असे जाहीर आवाहन आमदार प्रा. जयंत आससगावकर यांनी ‘कोजिमाशि’ च्या सत्ताधारी नेतृत्वाला दिले.     

    पेठवडगाव येथे ‘राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी’ च्या प्रचार मेळाव्यात  अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

  आमदार आसगावकर पुढे म्हणाले, ‘कोजिमाशि’ चे  सभासद उच्चशिक्षित शिक्षक आहेत. काय खरे, काय खोटे हे त्यांना चांगले समजते. एकतर्फी गैरकारभाराला या सभासदांचा मोठा विरोध आहे. मतपेटीतून हे सभासद या कारभाराविरोधात आपला कौल देतील. कोजिमाशिच्या सत्तेत मला स्वारस्य असण्याचे कारण नाही. आमच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचा कारभार उत्तम चालला आहे. त्या संस्था आम्ही जीवापाड जपतो. याशिवाय शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत उठावदार काम सुरू आहे. या सर्व कामामध्ये मी समाधानी व व्यस्त असल्याने ‘कोजिमाशि’ च्या सत्तेचा लोभ मला नाही. साडे आठ हजार सभासद हे तीचे मालक व निवडून येणारे संचालक तीचे विश्वस्त आहेत. मी ज्यांचे प्रतिनिधीत्व करतो त्या सभासदांच्या भावनांना न्याय देण्यासाठी मी कोजिमाशिच्या निवडणुकीत उतरलो आहे.

 प्राचार्य प्रदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक सलीम मकानदार, प्रताप देशमुख, ए. बी चौगुले ए. बी. पाटील, सुभाष पाटील, संभाजी खोचरे यांची भाषणे झाली.

मेळाव्यास के. के. पाटील, उदय पाटील विलास साठे, बी. के. मोरे, बाबा शेलार संजय डी. पाटील, गुरूप्रसाद यादव, डी. के. चव्हाण, माळी, शिरसाठ, आपटे, शिवराय भादोले, उमेदवार अभिजीत गायकवाड, आदींसह अन्य उमेदवार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी. बी. पाटील यांनी आभार मानले.