स्वाभिमानी सभासद विरोधकांच्या हजार-दोन हजाराच्या पाकिटाला भुलणार नाहीत : दादा लाड

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोजिमाशिच्या निवडणूकीत पराभव समोर दिसू लागल्याने विरोधी आघाडीने सभासदांना हजार-दोन हजाराच्या पाकिटांचे वाटप सुरू केले आहे. मात्र संस्थेचा सभासद हा सुज्ञ व स्वाभिमानी आहे. त्यामुळे तो कोणत्याही आमिषाला भुलणार नाही, मते विकणार नाही. ही संस्था मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या मालकीची आहे. सभासदांनी ही आपली मातृसंस्था राजकीय व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी सहकार आघाडीचे पॅनलप्रमुख, शिक्षक नेते दादा लाड यांनी केले.

स्वाभिमानी सहकार आघाडीच्या करवीर तालुका व कोल्हापूर शहरातील सभासदांच्या आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील होते. याप्रसंगी राजेंद्र पाटील, सचिन पाटील, खंडेराव जगदाळे, कैलास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

    दादा लाड पुढे म्हणाले, शिक्षक विधानपरिषद निवडणुकीवेळी माघार घेतल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोजिमाशिचे नेतृत्व दादा लाड करतील व आमदार म्हणून आसगावकरांनी काम पहावे, असा शब्द जाहीर सभेत दिला होता, असे असतानाही शिक्षक आमदार विरोधी पॅनेलचे नेतृत्व करून आपल्या नेत्याने दिलेल्या शब्दाचा अवमान करत आहेत. सुज्ञ सभासदांना या सर्व घटनांची जाणीव आहे त्यामुळे तुमच्या भुलथापांना ते बळी पडणार नाहीत सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीच्या पाठीशी ते खंबीर उभे आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडी मताधिक्याने विजयी होईल.

  विरोधकांच्या ताब्यात सत्ता गेली तर सभासदांना कर्ज मागणी अर्जावर शिफारस घेण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. विरोधी आघाडीचे नेते व काही उमेदवार हे आपल्या संस्थेतील शिक्षकांकडून पगारातील टक्केवारीने हप्ते गोळा करतात. या हप्तेगिरीमुळे संस्थेतील शिक्षकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विरोधकांना निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळेच परिवारासह आमदार व गोकुळचे दोन संचालक व काही राजकिय शक्ती मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. अशांना सुज्ञ सभासद थारा देणार नाहीत. चांगले वाईट सभासद ओळखून आहे. शिक्षक आमदारांनी पदाच्या माध्यमातून शिक्षण विभागातील जुनी पेन्शन, टप्पा अनुदान, डीसीपीएस, एनपीएस आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.सोन्यासारख्या चाललेल्या कोजिमाशि पतसंस्था व मुख्याध्यापक संघाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करू नये. शिक्षक आमदारांच्या अधिपत्याखालील डी. डी. आसगावकर पतसंस्था व बिंदू चौकातील शिक्षक पतपेढी या दोन्ही संस्थातील कर्जाचा व्याजदर जास्त, लाभांश कमी व दिवाळी भेट वस्तू अत्यल्प दिली जाते. त्यामुळे त्यांना कोजिमाशिच्या सभासदाभिमुख कारभारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कोजिमाशिचा कारभार चांगला नाही, असा सभातून आरोप करता तर मग बिनविरोधसाठी दहा संचालकाची मागणी कशासाठी केली होती? सभासदांची दिशाभूल करू नका. असा खडा सवाल केला. कोजिमाशी सभासदांनी स्वाभिमानी सहकारी आघाडीतील २१ उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

   याप्रसंगी चेअरमन बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, संजय परीट, डॉ. प्राचार्य डी.एस. घुगरे, राजेंद्र रानमाळे, व्हा. चेअरमन सुभाष पाटील दत्ता पाटील, रंगराव तोरस्कर, आर. आर. पाटील आदी मान्यवरांसह करवीरसह कोल्हापूर शहरातील सभासद मोठ्या संख्येंनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक  अनिल चव्हाण यांनी केले. आभार शितल हिरेमठ यांनी मानले.