बंडखोर सेनेचे कोल्हापुरात आज शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडात सहभागी झालेले कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आज कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेले राजेश क्षीरसागर सध्या मंत्री पदाच्या शर्यतीत असून त्यांचे आज गुरुवारी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते आणि बंडखोर सेनेचे समर्थक मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

 एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० वर आमदार गेले होते. त्यामध्ये माजी आमदार मात्र कोणीही नव्हते. एकमेव कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर त्यांच्याबरोबर राहिले. बंडाच्या काळात गुवाहाटी, गोवा आणि मुंबईपर्यंतच्या आमदारांच्या प्रवास, राहण्याची व्यवस्था, संरक्षण आणि इतर तजवीज करण्यात राजेश क्षीरसागर आघाडीवर होते. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून क्षीरसागर यांना मानले जाते. बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत मुंबईमध्ये तळ ठोकलेले

क्षीरसागर आज गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात पोहोचत आहेत. म्हणूनच त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. जल्लोष आणि शक्ती प्रदर्शन याचे अनोखे समीकरण आज कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे.