शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, नाराज एकनाथ शिंदे ११ आमदारांसह गुजरातमध्ये

मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल होते. तर ते ११आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा शिवसेनेकडून वारंवार फेटाळली जात असताना आता मात्र मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर काल सायंकाळपासून शिवसेनेचे ११ आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीला मुंबई आणि परिसरातील आमदारांची उपस्थिती होती. मात्र, एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सभेसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. मात्र, हे सर्व आमदार दुपारी बैठकीला उपस्थित राहणार की नाही, हे अनिश्चित आहे. हे सर्व आमदार गुजरातमधील सूरत शहरातील एका हॉटेलात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेमकी किती मते पडली?

विधानसभा निवडणुकीत भाजपची स्वतःची १०६ मते होती. तसेच, इतर अपक्ष आणि लहान पक्षांच्या मतांसह भाजपचे संख्याबळ ११३ वर जात होते. मात्र, काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली. त्यामुळे आघाडीची सुमारे २० ते २१ मते भाजपला मिळाल्याचे दिसून आले. राज्यसभा निवडणुकीपेक्षा १० अधिक मते मिळवत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा आहे. भाजप आता या आकडेवारीपासून केवळ ११ मतांनी दूर आहे. त्यामुळे ही बाब सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.